‘मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून १ मे पर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसंच, ‘जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान असेल,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.
‘लॉकडाऊनच्या काळात महामार्गाच्या कामात कुठे तरी अडचण येईल किंवा खंड पडेल असं वाटलं होतं. पण करोना काळातही महामार्गाचं काम थांबलेलं नाही. येत्या १ मेपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करु शकतो. १ मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ. त्याच्या पुढच्या १ मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेले असू,’ असं ठाम अश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणार आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होताच नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर अवघ्या ८ तासांत पूर्ण करता येणार आहे.
वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा
समृद्धी महामार्गावर दर ४० ते ५० किमी मार्गावर दोन्ही बाजूला वेसाइड ऍमेनिटीजची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच महामार्गावर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून वाहनांचा वेग, लेन कटिंग, वाहन ब्रेकडाऊन होणे इत्यादींवर लक्ष ठेवले जाणार आहे.