Marathi News

Bhagat Singh Koshyari: पुन्हा सरकार विरुद्ध राज्यपाल? – governor bhagat singh koshyari has not approved 12 mlc nominees yet, sent by maharashtra government


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या निवडीसाठी पाठवलेली यादी २१ नोव्हेंबरपर्यंत मंजूर करावी, अशी विनंती राज्य सरकारने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केली होती. त्याची मुदत शनिवारी संपत असताना यादी मंजूर करण्याबाबत मात्र राजभवनाकडून काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे या मुद्यावरून येत्या काळात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल, असा पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून ६ नोव्हेंबरला विधान परिषदेसाठीच्या १२ नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन १२ उमेदवारांच्या नावांची यादी सोपवली होती. राज्यपालांनी २१ नोव्हेंबरपर्यंत यादी मंजूर करावी, अशी शिफारसवजा विनंतीही त्यावेळी करण्यात आली होती.

या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे, काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर; तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी या नावांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीकडून २१ नोव्हेंबरला यादी जाहीर करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीची मुदत २१ नोव्हेंबरला संपत असली, तरी राजभवनाकडून यादी जाहीर करण्याबाबत अद्याप काहीच माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आलेली नाही. ही यादी जाहीर करण्याबाबत राज्यपालांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप याआधीच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केला होता. त्यामुळे यादी देतानाच मुदतीची शिफारस करण्यामागेही महाविकास आघाडीची रणनिती होती. साहजिकच आता महाविकास आघाडी आणि राज्यपाल, असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार असून, त्याची सुरुवात आघाडी कशा पद्धतीने करणार आहे, याबाबत उत्सुकता आहे.

आघाडीचे नेते निर्णय घेणार

राज्यपालनियुक्त जागांबाबत करण्यात आलेल्या मुदतीची शिफारस संपत असल्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांना विचारले असता, ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना राज्यपालनियुक्त जागांबाबत १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. परंतु, याबाबत राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे याबाबत पुढे काय भूमिका घ्यायची याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.

‘शेलारांनी भाजपचा महिला मुख्यमंत्री ठरवावा’

अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना, आमदार आशीष शेलार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये, असा टोला परब यांनी लगावला. भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आशीष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, असे मत व्यक्त केले होते. त्याबाबत ते बोलत होते.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: