Marathi News

Bigg Boss controversy: बिग बॉसमध्ये मराठीचा अपमान: दोन माफीनामे चर्चेत; जान सानूवर कोणती कारवाई? – bigg boss 14 viacom 18 writes apology letter to mns chief raj thackeray in marathi


मुंबई: गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानू याने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये मराठी भाषेचा द्वेष करणारं वक्तव्य केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, शिवसेना आणि मनसे नेत्यांनी बिग बॉसचा शो बंद पाडण्याचा इशारा दिल्यानंतर तातडीने कलर्स वाहिनीचे संचालन करत असलेल्या वायकॉम १८ या कंपनीने माफीनामा सादर केला आहे. विशेष म्हणजे आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कंपनीकडून माफीनामा पाठवण्यात आला आहे. ( Bigg Boss Controversy over Marathi Latest Updates )

वाचा: मराठीचा अपमान; कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर

वायकॉम १८ ने मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या शोमध्ये २७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात स्पर्धक जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या आक्षेपाची आम्ही नोंद घेतली आहे. भविष्यात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या सदर मालिकेच्या भागांतून आक्षेपार्ह विधान वगळण्यात येत आहे. मराठी भाषेबद्दल करण्यात आलेल्या या विधानामुळे जर नकळत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. आमच्यासाठी प्रेक्षक महत्त्वाचे आहेत. मराठी आणि देशातील प्रत्येक भाषेचा आम्ही आदर आणि पुरस्कारही करतो, असे या माफीनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

वाचा: घराणेशाही मुद्दा; राहुल वैद्य आणि जान सानू भिडले

वायकॉमने पाठवलेल्या दोन माफीनाम्यांची चर्चा होण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेला माफीनामा इंग्रजीत आहे तर राज ठाकरे यांना मराठीतून माफीनामा पाठवण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे नेते अमेय खोपकर यांनी तर या माफीनाम्यांवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’. कलर्सवाल्यांना पण माहिती आहे खरं सरकार कुठे आहे’, असे ट्वीट खोपकर यांनी केले आहे.

कारवाईवर प्रश्नचिन्ह?

मराठी भाषेचा अवमान झाल्याबद्दल वायकॉम १८ ने माफीनामा सादर केला असला तरी संबंधित स्पर्धक जान कुमार सानू याच्यावर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. माफीनाम्यात त्याबाबत काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे हा माफीनामा शिवसेना आणि मनसेला मान्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी जान याची बिग बॉसमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तर मनसे नेते अमेय खोपकर यांनीही बिग बॉसचे चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिला होता.

वाचा: आता मराठी माणसं तुला थोबडवनार; जान कुमार सानूला मनसेचा इशाराSource link

You may also like

%d bloggers like this: