सांगली:सांगली महानगरपालिकेतील स्थायी समिती आणि प्रभाग समिती निवडींमध्ये भाजपची दमछाक झाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर महापौर गीता सुतार यांनी शहराच्या विकासासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना महापालिकेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. याबाबत विचारणा केली असता, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याचे सांगत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत केले. शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांनी मिळून काम करण्याची कार्यपद्धती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाचा: ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय उपयोग? राज्य शरद पवार चालवतात’

पालकमंत्री जयंत पाटील यांना भाजपच्या महापौरांनी महापालिकेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण स्वीकारून पालकमंत्री पाटील यांनी भाजपचे स्थानिक नेते बैठकीसाठी उपस्थित राहावेत, असा आग्रह धरला. याशिवाय भाजपमधील स्थानिक नेत्यांवर आपले विशेष प्रेम असल्याचेही जाहीर वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सगळ्या पक्षांनी मिळून विकासकामे केली पाहिजेत. हे असेच चालले पाहिजे. हीच कार्यपद्धती असली पाहिजे. महानगरपालिका चालवण्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. शेवटी सरकार बदलल्यानंतर सरकारमधील लोकांचे काय म्हणणे आहे, हे अधिकारी बघत असतात. सरकार बदलून एक वर्ष झाले तरीही आमची विकासकामे सुरूच आहेत. सांगली महापालिकेला १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा आम्ही केली होती. यातील ९ कोटींच्या कामांचा शुभारंभ आम्ही केला आहे.’Source link