मांजरी, पुणे: कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत महिनाभरापासून
शेतकरी आंदोलन सुरू असतानाच, आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील मांजरीत शेतकरी संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात फडणवीस यांनी ठाकरे सरकार, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाजावाजा करत शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. कमी पैसे काय देता असे म्हणत, ५० हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे, असे ते म्हणाले. कोरडवाहू जमिनीसाठी २५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. त्यात आमचे अजितदादा तर त्याहीपेक्षा वर निघाले. उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणता, बागायतदारांना तर दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले. आम्हाला तर ते शेतकऱ्यांचे कैवारी वाटले. पण कसले ५० हजार, २५ हजार आणि दीड लाख, राजा उदार झाला नाही, तर उधार झाला, हाती भोपळा आला अशी परिस्थिती सध्याच्या सरकारमध्ये दिसते, असा टोला फडणवीस यांनी लगावला. शेतकऱ्यांना सहा-आठ हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते, तेही मिळाले नाहीत. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांना अधिकारच, कृषी कायद्यात चुकीचं काय?, पंतप्रधानांचा प्रश्न
ठाकरे सरकारने विमा योजना बासनात गुंडाळली
साखरेच्या अर्थकारणामध्ये गेल्या पाच वर्षांत जे निर्णय झाले, ते याआधी कधीही झाले नाहीत. मोदी सरकारने ते करून दाखवले. अतिवृष्टी झाल्यानंतर आज या सरकारच्या काळात कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्याला मिळत नाही. आम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजना आणली होती. त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. आता शेतकऱ्यांवर संकट कोसळलं तर, एक नवा पैसाही विम्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळाला नाही. ही विमा योजना आम्ही चार वर्षे चांगल्या प्रकारे लागू केली होती. या सरकारने ही विमा योजनाच एकप्रकारे बासनात गुंडाळून ठेवली, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
‘काळे कायदे मागे घ्या’, ‘आप’ खासदारांची पंतप्रधानांसमोर घोषणाबाजी
‘आता शेतकऱ्याचा विचारही केला जात नाही’
आताच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी बोलणारा, त्यांचा विचार करणारा कुणीही नाही. आम्ही शेतकऱ्यांना पैसा दिला. ज्या-ज्या वेळी संकट आलं त्या-त्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलो. आज काही झालं तरी त्यांच्याकडे ढुंकूणही पाहिले जात नाही. शेतकऱ्याचा विचारही केला जात नाही. अशी परिस्थिती सध्याच्या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे, याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले.