governor Bhagat Singh Koshyari: विधान परिषद: राज्यपालांकडे नावे पाठवताना ठाकरे सरकारची मोठी खेळी – maharashtra governor bhagat singh koshyari should announce the mlas as soon as possible says congress leader prithviraj chavan


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यपाल नियुक्त १२ जागांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देताना महाविकास आघाडी सरकारने चांगलीच खेळी केली असून त्यांनी यादी देताना राज्यपालांकडे १५ दिवसांच्या मुदतीचीही शिफारस केली. या मुदतीत राज्यपालांकडून काही कार्यवाही झाली नाही तर महाविकास आघाडीला राज्यपालांकडे जाब विचारण्याची संधी मिळणार आहे. साहजिकच २१ नोव्हेंबरपर्यंत या यादीबाबत राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास महाविकास आघाडीविरोधात राज्यपाल असा आणखी एक सामना राज्याला पहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी ६ नोव्हेंबरला देण्यात आली. मात्र ही यादी देताना महाविकास आघाडीने एक चांगलीच खेळी केली. राज्यपालांना केवळ नावांची यादी दिली असती तर मग राज्यपाल त्यावर कधी निर्णय घेणार याची महाविकास आघाडीला वाट पहावी लागली असती. त्यामुळे आघाडीने यादी देताना यादीतील नावे १५ दिवसांच्या मुदतीत जाहीर करावीत, अशी शिफारस राज्यपालांकडे केली.

आघाडीने शिफारस केलेली मुदत २१ नोव्हेंबरला संपत आहे. साहजिकच राज्यपालांना या नावावर तोपर्यंत निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यपालांनी याबाबत काहीच निर्णय घेतला नाही तर त्यानंतर महाविकास आघाडी सरकारला या मुदतीबाबत राज्यपालांकडे विचारणा करण्याची आयतीच संधी मिळणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकप्रकारे राज्यपालांवर दबाव टाकण्याचा यातून प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी १२ सदस्यांच्या नावांची शिफारस यादी राज्यपालांना दिली असून त्याबाबतची घोषणा लवकरात लवकर करावी, अन्यथा याचा संदेश बाहेर चुकीचा जाऊ शकतो, असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

‘राज्यघटनेचा आदर व्हावा’

राज्यघटनेप्रमाणे विधान परिषदेमध्ये १२ सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना असतो. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी १२ नावांची शिफारस यादी राज्यपालांना दिली आहे. या शिफारसीचा राज्यपालांनी आदर केला पाहिजे, असेही चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. राज्यपाल नियुक्त बारा जणांच्या नावांची घोषणा लवकरात लवकर केली पाहिजे. यामध्ये उशीर झाला तर यात राजकारण होत आहे, असा चुकीचा संदेश जाऊ शकतो. राजकीय नेत्यांनी काहीही सांगितले असले तरी राज्यपालांनी राज्यघटनेचा आदर केला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे, असेही मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.Source link

Leave a Reply