MNS: सोमवारपर्यंत वीज बिलं माफ न झाल्यास आंदोलन; मनसेचा सरकारला इशारा – mns gives ultimatum to gov against inflated electricity bills


मुंबई: सर्वसामान्यांना आलेल्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. सोमवारपर्यंत वीज बिल माफ केले नाही तर राज्यात जनआंदोलन करु, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वाढीव वीजबिलासंबंधित मनसे पदधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

वाढीव वीजबिलात माफ करण्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेची फसवणूक आहे. त्यामुळं जनतेमध्ये संतापाची भावना आहे. सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

वाचाः मनसे नेमकं काय करणार?; ‘या’ ट्वीटमुळं चर्चेला उधाण

सोमवारपर्यंत वीजबिल माफ नाही केलं तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलनं होतील. तसंच, महावितरणचे कर्मचारी वीज कापण्यासाठी आल्यास मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

वाचा: मनसेसोबत युती करणार? भाजप नेत्यानं दिले ‘हे’ संकेत

शरद पवारांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत देत नाहीत

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे राज्यपालांना भेटले. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्यास सांगितले. राज ठाकरे यांनी शरद पवारांसोबत संपर्क साधल्यानंतर पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. ती निवेदनंही आम्ही दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला नाही. आता तर वीजबिल माफी शक्य नसल्याचं उर्जामंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळं पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही असं आम्हाला वाटतं, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे.Source link

Leave a Reply