मुंबई: ‘वाढीव वीज बिले भरावीच लागतील. कुठलीही सवलत मिळणार नाही,’ असं सांगत सर्वसामान्यांना झटका देणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. ‘लाथों के भूत बातों से नही मानते’ असं म्हणत सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.

सर्वसामान्यांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष मीटर वाचन शक्य नसल्यानं वीज ग्राहकांना आधीच्या तीन महिन्याच्या वीज वापराच्या आधारे अंदाजित बिल देण्यात आले होते. मात्र, या काळात अनेकांना अव्वाच्या सव्वा बिले आल्याच्या तक्रारी आल्या. वाढीव वीज बिलांचा झटका बसलेल्यांमध्ये सर्वसामान्य ग्राहकांपासून सेलिब्रिटीचाही समावेश होता. राज्यातील विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा हा मुद्दा चर्चेला आला होता. लोकांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं त्यावेळी सरकारनं सांगितलं होतं. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता या आश्वासनावरून घूमजाव केलं आहे. महावितरणची सध्याची परिस्थिती पाहता वीज बिलात सवलत देणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपनंही सरकारला घेरलं आहे. तर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

वाचा: राज्यातील भाजपवाल्यांचं डोकं सरकलंय काय? शिवसेनेचा हल्लाबोल

त्या पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘वीज बिलांच्या बाबतीत निवेदनं, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण, ‘लाथो के भूत बातों से नही मानते,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वाचा: सरकारमध्ये संघर्षाच्या ठिणग्या; अजितदादांकडून सेनेला झुकते माप?Source link