पक्षाचे प्रभारी सचिव एच. के पाटील या मुद्द्यांवर गुरुवारी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असून मग मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष ठरवण्यात येणार आहे. सध्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आ. भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, चरणसिंह सप्रा या तीन नेत्यांची नावं आघाडीवर वर आहेत. मराठी मतांमध्ये काँग्रेसचा किमान जनाधार तयार व्हावा, या उद्देशाने जगताप यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जातं आहे.
गेल्या काही वर्षांतील मुंबई काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणाला मुठमाती देऊन मुंबईतील पक्ष संघटना वाढविण्याचा भाग म्हणून पक्षाचे मुंबई नेतृत्व बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच, येत्या दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळं मराठी मतं मिळवण्यासाठी मराठी भाषिक नेत्यांचा विचार काँग्रेस करत असल्याचंही बोललं जातं आहे.
काँग्रेस पक्षाचा मुंबईत असलेला पारंपरिक जनाधार विस्कळीत झालेला आहे. दलित, मुस्लिम, उत्तर भारतीय या काँग्रेसच्या जनाधारातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर मोदी यांच्या झंझावतानंतर भाजपकडे गेलेले आहेत. दलित जनाधारही खंबीर नेतृत्व नसल्याने नव्या पर्यायाच्या शोधात आहे. केवळ मुस्लिम मतांवर राजकारण करायला गेल्यास मुस्लिमांचीही मते मिळत नाहीत. अशा तिढ्यात मुंबई काँग्रेस सध्या सापडली आहे.