Marathi News

Mumbai Municipal Corporation: पुन्हा सज्जता! मुंबईबाहेरुन येणाऱ्यांच्या चाचण्या, करोनाकेंद्रे सतर्क – corona cases increases in mumbai from last five day therefore anxiety increased among mumbai municipal corporation


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

दिवाळीत बाजारात झालेली गर्दी, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळे नियंत्रणात आलेला करोना पुन्हा डोके वर काढत आहे. मागील पाच दिवसांत मुंबईत रुग्णांची संख्या दुपटीने वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळे पालिकेने पुन्हा तपासण्या, चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या बंद असलेली करोना केंद्रे व रुग्णालयांना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली होती. मात्र, दिवाळीनंतर आठवडाभरातच ही संख्या दुपटीने वाढली आहे. यापूर्वी गणपती, नवरात्रीत झालेली गर्दी, गाठीभेटी व विनामास्क वावर, तसेच सुरक्षित वावरचा उडालेला फज्जा यामुळे आटोक्यात आलेली संख्या दुपटीने वाढली होती. दिवाळीच्या आधी १६ नोव्हेंबरला रुग्णसंख्या ४०० पर्यंत खाली आली होती. त्यानंतर मागील पाच ते सहा दिवसांत दररोज ४०० ते ५०० रुग्ण वाढत जाऊन एक हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम अधिक तीव्र करण्यासाठी पावले उचलली आहेत. गणेशोत्सवात वाढलेला करोना नियंत्रणात आणण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरली होती. या मोहिमेत दोन महिने झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते. ‘मागच्या मोहिमेवेळी बंद असलेल्या घरांना आता पुन्हा भेटी दिल्या जाणार आहेत. तसेच मुंबईबाहेरून परतलेल्या कुटुंबीयांच्या तपासण्या, चाचण्या केल्या जाणार आहेत,’ असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तसेच ‘करोनारुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने तात्पुरती बंद केलेली करोनाकेंद्रे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यास पुन्हा सुरू केली जातील. करोनासाठी सर्मपित रुग्णालयांतील सर्व यंत्रणा सज्ज आहे’, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या होत असलेली रुग्णवाढ ही दिवाळीत चाचण्या कमी प्रमाणात झाल्याने दिसते आहे. आता या चाचण्या तिप्पट म्हणजे, दररोज १७ हजारांहून अधिक होत असल्याने रुग्णांची संख्या वाढली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. करोनाकेंद्र व रुग्णालयात पुरेशा खाटा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

‘लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा’

शहर आणि उपनगरात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करा, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. रुग्णांचा आकडा पुन्हा फुगतो आहे. नागरिक करोनाबाबत गंभीर नाहीत. तर दुसरीकडे मुंबईचे राजकारण करण्याचा घाट दोन टक्क्यांच्या लोकांनी घातला आहे, असा आरोप पेडणेकर यांनी भाजपचे नाव न घेता केला आहे.

मुंबईत रुग्णांचा वाढता आकडा चिंतेत भर टाकणारा आहे. त्यामुळे पालिकेने पुन्हा उपाययोजना वाढवल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या काही दिवस बंद करायला हव्यात.

– किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

सध्या दिसत असलेली रुग्णवाढ दिवाळीनंतर चाचण्या वाढवण्यात आल्याने दिसते आहे. रुग्णवाढ झाली, तरी करोनाकेंद्रे व रुग्णालयात पालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्ण सज्ज आहे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

– मुंबईतील एकूण रुग्ण – २,७५०००

– विविध रुग्णालयात उपचार सुरू- १०,०००

– एकूण मृत्यू- १०,६४०

– आतापर्यंत बरे झालेले रुग्ण- २, ५०,५००

– करोनावाढीचा दर- ०.२५ टक्के

– बरे होण्याचा दर- ९२ टक्के

– आतापर्यंतच्या चाचण्या- १७,४००००

– रुग्णदुपटीचा कालावधी- २९६ दिवसSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: