मुंबई: पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते
रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी फटकारले आहे. दानवे हे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे मला माहिती नव्हतं, असा टोला लगावत पवारांनी दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच, महाविकास आघाडीचे सरकार तीन महिने टिकणार असा दावा करणाऱ्या दानवेंबाबतही पवारांनी चिमटा काढला आहे. ‘रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत, हे मला माहिती नव्हतं. दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते राजकारणात आहेत. पण त्यांचा हा गुण मा माहिती नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ज्योतिषी म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं,’ असा मिश्किल टोला शरद पवारांनी लगावला आहे.
वाचाः प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा; काँग्रेसने उपस्थित केले ‘हे’ सवाल
‘महाराष्ट्र वेगळ्यापद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनं केला आहे. जनतेची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत असून राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घऊन काम करत आहे. राज्यात आज जे सरकार आहे त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा आहे,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत भाजपला खडे बोल सुनावले आहेत.
वाचा: सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई ; चंद्रकांत पाटलांनी केला ‘हा’ खुलासा
प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. ‘जनतेच्या प्रश्नाची उत्तरे देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांविरोधात सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे त्यामुळं आता पुन्हा सत्तेत ते येणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळेचं केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,’ अशी टीका पवारांनी केली आहे.
वाचाःExplained: कोण आहेत प्रताप सरनाईक? त्यांचा व्यवसाय काय?
Source link
Like this:
Like Loading...
Related