Marathi News

sarang punekar: युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीच्या पुढचे पाऊल; घेतला ‘हा’ क्रांतिकारी निर्णय – youth congress appoints transgender sarang punekar as spokesperson


अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात एलजीबीटी समुहासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यानंतर प्रदेश युवक काँग्रेसने त्याही पुढे एक पाऊल टाकले आहे. प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी तृतीय पंथीय समूहातून येणाऱ्या सारंग पुणेकर यांची थेट प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. एलजीबीटी समुहातील व्यक्तीला थेट पक्षाच्या मुख्य प्रवाहातच काम करण्याची संधी प्रदेश युवक काँग्रेसने उपलब्ध करून दिली आहे.

समाजाने नाकारलेल्या त्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला. त्यासाठी गेल्या महिन्यात पक्षात स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. राजकीय क्षेत्रातील या वेगळ्या प्रयोगाची सर्वच स्तरांतून चर्चा झाली.
आता प्रदेश युवक काँग्रेसनेही याहीपुढे जाऊन एक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्यापदी तृतीय पंथीय समूहातून येणाऱ्या व समाजाच्या विविध प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या सारंग पुणेकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा तांबे यांनी केली. यासोबतच आनंद सिंग, रिशीका राका, लटोया फन्स, कल्याणी माणगावे, बालाजी गाडे, कपिल ढोके, निलेश आंबेवाडेकर, दर्शन पाटील, कृष्णा तवले या प्रवक्त्यांचीही नियुक्ती केली आहे. एलजीबीटी समुहातील व्यक्तीला थेट पक्षाच्या मुख्य प्रवाहातच काम करण्याची संधी याद्वारे देण्यात आली आहे. सारंग पुणेकर कवियत्री आहेत. अनेक आंदोलनांत त्यांनी भाग घेतला आहे. लॉकडाउच्या काळात पुण्यात त्यांनी समूहातील वंचितांसाठी भरीव काम केले आहे.

वाचा: राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार; तर्कवितर्कांना उधाण

या समूहाला राजकारणात आणून संधी देण्याची सुरवात वंचित बहुजन आघाडीने केली आहे. श्रीरामपूर येथील दिशा शेख यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्तेपद यापूर्वीच मिळाले आहे. त्यावेळी दिशा शेख यांच्याही काँग्रेसमधील प्रवेशाचे प्रयत्न काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू होते. मात्र, त्याला यश आले नव्हते. आता दिशा शेख काँग्रेसमध्ये आल्या नसल्या तरी पुणेकर यांना पक्षात घेऊन आणि महत्वाची जबबादारी देऊन प्रदेशाध्यक्ष तांबे वेगळा संदेश दिल्याचे मानले जात आहे.

वाचा: मुंबई लोकलसाठी खासगी कर्मचाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणारSource link

You may also like

%d bloggers like this: