Marathi News

Shiv Sena on Reopening Temples: Shiv Sena Slams BJP Leaders For Taking Credit For Reopening Temples – ‘भाजपमधल्या उपऱ्यांनी मोदींच्या घरासमोर आंदोलन करायला हवे होते’


मुंबई: ‘गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारच्या आदेशानुसारच सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं बंद होती. त्यामुळं भाजपमधील उपऱ्या व नाच्या हिंदुत्ववाद्यांनी मंदिरे उघडा असं आंदोलन पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोरच करायला हवं होतं. पण, ते महाराष्ट्रात ढोल-ताशे वाजवून बिनबुडाचे राजकारण करत आहेत. यातून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे,’ अशी खरमरीत टीका शिवसेनेनं केली आहे.

राज्यातील मंदिर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतल्यापासून नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. आमच्या दबावामुळंच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं भाजपचं म्हणणं आहे. भाजपचे राम कदम, प्रवीण दरेकर यांसारख्या काही नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन याचा आनंद साजरा केला. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या नेत्यांवर तोफ डागली आहे. ‘भाजपला नक्की काय झालं आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचं डोकं सरकलं आहे का? असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

आमच्यामुळं देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालीत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे.

बाटग्यांनी हिंदुत्वावर बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा विनोदच म्हणावा लागेल. कुणीतरी एक बोगस ‘आचार्य’ पुढे करून मंदिरांचे टाळे उघडा यासाठी आंदोलन केले. कोण कुठले हे आचार्य? पण भाजपला फुकटात नाचायला लोक मिळतात. ते भाड्याने वापरून महाराष्ट्र सरकारच्या नावाने शिमगा करायचा हा त्यांचा रिकाम्या वेळेतला उद्योग झाला आहे.

वाचा: सरकारमध्ये संघर्षाच्या ठिणग्या; अजितदादांकडून सेनेला झुकते माप?

मुळात गेल्या आठ महिन्यांपासून जनतेच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद होती. जसजसे करोनाचे संकट निवळत गेले तसतसे एक-एक क्षेत्र उघडण्यात आले. हे सर्व केंद्राच्याच सूचनांनुसार घडत होते. त्यामुळे भाजपतील उपऱ्या व नाच्या हिंदुत्ववाद्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोरच आंदोलन करायला हवे होते. दिल्लीतील जंतरमंतर रोड, रामलीला मैदान, विजय चौकात घंटा, थाळ्या वाजवून मंदिरे उघडा असे आपल्या पंतप्रधान, राष्ट्रपतींना सांगता आले असते.

करोनाची दुसरी लाट उसळण्याचा धोका कायम आहे. मंदिरे, बाजार, सार्वजनिक स्थळे यातूनच करोनाचे संक्रमण वाढणार असे तज्ञांना वाटते. पण वैद्यकीय सल्ले, तज्ञांचे मार्गदर्शन याची पर्वा करतील ते भाजपवाले कसले? दिल्लीत सर्वकाही घिसाडघाईत उघडले. त्याचा परिणाम तेथे कोरोनाची दुसरी लाट येण्यात झाला. आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दुसऱ्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर त्यात मंदिरे पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचा या प्रश्नी अभ्यास कच्चा आहे.

विधान परिषद: खडसे, शेट्टींसह ८ जणांच्या नियुक्तीला आक्षेप

आता ते ‘छटपूजे’स परवानगी मिळावी म्हणून राजकीय आंदोलन करीत आहेत. छटपूजेस एरवी कधीच परवानगी नाकारली नाही, पण यानिमित्ताने समुद्रकिनारी जो प्रचंड जनसमुदाय जमा होतो तो करोना काळात योग्य आहे काय, याचा सारासार विचार करण्याची बुद्धी ते गमावून बसले आहेत. जेथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तेथे ते अशा प्रकारची आंदोलने करून लोकांना संकटात ढकलत आहेत. हे क्रौर्यच म्हणायला हवे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्याला सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे. अशा लोकांविषयी काय लिहायचे व काय बोलायचे? देवदेवतांनो, त्यांना सुबुद्धी द्या असे म्हणण्याचीही सोय नाही. भाजपातील या उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: